Saturday, 20 September 2025

'अतुल'नीय - #अनुभूति

'अतुल'नीय - #अनुभूति" 
शरद जयश्री कमळाकर चव्हाण

जेव्हा मोबाईल सराईत झालेले नव्हते तेव्हा बस व रेल्वे प्रवासामध्ये हमखास पुस्तके माझ्या सोबत असायची. ठरवून त्या त्या प्रवासामध्ये कोणते पुस्तक वाचायचे ह्याची पण यादी असायची. 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य करत असताना महिन्यातील किमान पंधरा दिवस प्रवासामध्ये नक्की जायचे. त्या प्रवासात 200+ पानांची अनेक पुस्तके वाचून काढलेली आठवतात.
2015 नंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाच्या निमित्त्याने प्रवास व्हायचा परंतु या प्रवासात पुस्तके हळूहळू बॅगेतच विराम करायल लागली. पुस्तकाची जागा मोबाईल ने घेतली आणि वाचना ऐवजी लिखाणाची गती आणि प्रगती वाढली प्रगती म्हणून काही लेख माझ्या नावावर जमा होवू लागले. तरी सवयीनुसार एक-दोन पुस्तके नाममात्र सोबत करायची.  बदल इतकाच झाला की पूर्वी पुस्तकांचे खंड वाचून व्हायचे आता छोट्या पानांची पुस्तके ही वाचून पूर्ण होत नाहीत... असो....
....कालच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची प्रांत संघटन मंत्री बैठक संपवून रांची हून सिलिगुडीला बसने निघालो.  
थोडा वेळ मोबाईलमय झालो. बरेच दिवसांनी निसर्गाची चित्रे काढली. त्यात मोबाईलची बॅटरी दिचार्ज झाली त्यात पुन्हा प्राण येईपर्यंत ' कम्पल्सरी' विकत घ्याव लागलेले नवीन पुस्तक बाहेर काढले.
संध्याकाळी बसच्या गती नुसार आणि अंधुक प्रकाशात वाचायला घेतलेले 120 पानांचे पुस्तक रात्री 12 च्या ठोक्याला पूर्ण झाले. बरेच दिवसानंतर पूर्वी अनुभवलेली पुस्तक वाचण्याची धुंदी, त्यातील रेखाटलेले प्रसंग, लिखाण ह्यावर थांबून थांबून विचार करायला भाग पाडणारी तंद्री, वर्तमान पुस्तकातून प्रकटलेल्या व्यक्ती, आठवणी, प्रसंग तद्रुप होऊन गत स्मृतींच्या पाना पानांत दडलेल्या असंख्य खाणा खुणा, बुकमार्क, पिंपळपाने नकळत जागृत झाली.
सकारात्मक ऊर्जा, सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ सेवा करणारी संस्कारित मने आणि देव दुर्लभ कार्यकर्ते जणू आपल्या समोर एकामागून एक साकार होत असल्याचा प्रत्यय आला. 
आपण स्वीकारलेले व्रत नियमा प्रमाणे सुरू आहे ना? असा प्रश्न विचारणारी, नवीन ऊर्जा देणारी एक वेगळीच अनुभूति ह्या पुस्तकाच्या माध्यमातून साकारली जात आहे असा अनुभव हे पुस्तक संपविताना लक्षात आला. 
हे ही लक्षात आले की बरेच दिवसानंतर सुंदर अशी एक आनंदाची, तृप्तीची "अनुभूति" या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे.
मुखपृष्ठावर वॉटर मार्क स्वरूपात दिसणाऱ्या वृक्षांच्या पृष्ठभूमीवर हाताने साकारलेल्या ठळक अक्षरातील पुस्तकाचं नाव
"#अनुभूति" कळत नकळत त्याला झालेला मानवी कॅलिग्राफी स्पर्श, त्यातील भावभावनांशी आपणाला सहज जोडतो.
पुस्तक शीर्षकाच्या वर लोगोच्या रुपात आपणाला दिसतो;
धनुष्यधारी बालक, उगवता सूर्य आणि त्याखाली उमटलेली ' तू मैं एक रक्त' ही अक्षरे
माती रंगाच्या गवाक्षावर गोंदवलेला हा लोगो जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या गेल्या 75 वर्षाच्या कार्याची मोहर आहे हे वेगळे सांगायला नको.
त्या मुळे आतील सारी अनुभूती ही जल, जमीन, जंगल, जनजाती क्षेत्रातील असणार हे ही अधोरेखित होते.
खाली प्रकाशकाचा लोगो आणि 'अतुल जोग' अर्थात लेखकाचे नाव !
मल पृष्ठावर पुस्तक संदर्भ, त्यात काय आहे याची थोडक्यात छापलेली प्रस्तावना आणि ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्या अतुल जोग यांचा संक्षिप्त परिचय. 
सहज सुन्दर अशा हिंदी भाषेतील हे पुस्तक वाचताना, समजून उमजून मनाचा ठाव कधी घेते हे समजतच नाही ! 
प्रकाशक तितकाच दर्जेदार लाभलेला आहे दिल्लीतील प्रभात प्रकाशन हे नाव नवनवीन कल्पना व नवीन लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते.
वर्तमान विक्री प्रणालीशी जोडणारी e संरचना आणि हो पुस्तक विकत घ्यायचे असेल तर 250 रुपयात 120 पानांचे हे पुस्तक कुठे? कसे? उपलब्ध होणार ते ही मल पृष्ठावर अधोरेखित केलेले आहे.

सहज शेवटचं पान उलटल्यानंतर सहा ओळींचा समारोप आपणाला पाहायला मिळतो. त्याच्या पहिल्या दोन ओळी संस्कृत भाषेतील एक श्लोक आहे. ज्याचा मतितार्थ उर्वरित चार ओळीत सांगितलेला आहे "एखादी वस्तू आश्चर्यरित्या पाहून, ऐकून अथवा आश्चर्यरित्या प्रसारित करून ही शेवटी आश्चर्य व्यापून राहते तेच विस्मयकारक आश्चर्य होय. त्यानंतर 
शेवट ' ऐसा मेरा मित्र रामथंगा एक अवलिया था' ....
...... खरंतर हा शेवट; उत्सुकता म्हणून पुस्तकाचा आहे की कोणत्या प्रकरणाचा आहे याचा तपास केल्यानंतर लक्षात आलं की हे सलग कथा कादंबरी सारखं पुस्तक नाही तर छोट्या छोट्या कथा स्वरूप व्यक्ती दर्शनाची 37 सुवर्णपृष्टे आहेत.
त्यातील हा रामथंगा 117 पानापासून 120 पानापर्यंत व्यापलेला आहे ज्यात मिजो जनजातीमधील हा युवक मिजो भाषेत रामायण भाषांतरित करत होता बरोबरीने हिंदी, संस्कृत, खासी, उर्दू, फारशी या भाषेंचाही अभ्यासक होऊन त्या त्या भाषेचा उपयोग आपला स्वधर्म टिकवण्यासाठी उपयोगात आणत होता. अवघ्या 45 व्या वर्षी देवाला प्रिय झालेला रामथंगा हा मिजो जातीतील हिरा होता असे लेखकाला वाटते.
 
हे प्रकरण वाचून झाल्यानंतर कळतं नकळत उलट्या क्रमांकाने प्रकरणे वाचत गेलो ते अगदी 26 नंबर पर्यंत.... 
"काश हमारे ऑस्ट्रेलिया मे भी वनवासी कल्याण आश्रम जेसी संस्था होती"..
मग लक्षात आलं की ही ' नापाक' उलटी वाचन संस्कृती आपण का स्वीकारली परंतु वर म्हटल्याप्रमाणे पुस्तकच इतके सजीव झालेले आहे की ते पहिल्या क्रमांकापासून वाचा किंवा शेवटच्या क्रमाने वाचा तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार हे नक्की !
...चूक लक्षात येऊन मग पुस्तक सरळ केले म्हणजे प्रकाशक, प्रस्तावना, अनुक्रमणिका, आणि विषय प्रवेश ह्यातील प्रस्तावना, लेखकाचे मनोगत आणि प्रकरण पहिले यावर शेवटी भाष्य करणे अधिक संयुक्तिक ठरेल. असे मला वाटते.

....तर उलट्या क्रमाने 26 पर्यंत कथा वाचल्यानंतर पहिल्यापासून प्रकरणं वाचण्यास सुरू केली आणि मग लक्षात आलं की, "#अनुभूति" हे पुस्तक लिहिणारे अतुल जोग यांचा तर आपला निकटचा परिचय आहे परंतु तो एक कुशल संघटक, संघटन प्रमुख, मित्र, मार्गदर्शक व वक्ता या नात्याने परंतु गेली तीस वर्षे ते ज्या क्षेत्रामध्ये राहिले, वावरले विशेष करून उत्तर पूर्वांचलातील सात राज्यात त्यातही नागभूमी हे त्यांचे प्रारंभीचे कार्यक्षेत्र राहिले तिथून सुरू झालेला प्रवास, तिथे भेटलेल्या व्यक्ती या वेष परिवेश, दिसायला, सामाजिक आर्थिक दृष्ट्या सामान्य स्तराच्या होत्या परंतु त्यांनी काही प्रसंगी अथवा वेळोवेळी दाखवलेल्या असामान्य गुणांची दखल संवेदनशील अशा कार्यकर्ता रूपातील अतुलजीनी टिपली ती स्पंदने लेखक म्हणून तंतोतंत अवतरली तेच हे #अनुभूति पुस्तक होय.
त्या मुळे ह्या पुस्तकाचा अनुभव कालखंड स्वाभाविकपणे हा 1994 ते 2025 असा आहे आणि मुख्य चौकट ही पूर्वांचल क्षेत्र म्हणजेच 7sister राज्य आणि सिक्किम आहे.  

#अनुभूति वाचताना लक्षात येते की केवळ 37 माणसांचे हे व्यक्ती चित्र नाही तर 37 बरोबर आणखी काही माणसांच्या स्वभाव विशेषाची, गुणांची अथवा कठीण प्रसंगी दाखवलेल्या धीरोदत्तपणाची, प्रत्यक्ष आलेल्या प्रसंगाला, नित्य जीवनाशी दोन हात करून, धैर्याने, अनुपम अशा व्यवहार व कार्य पद्धतीने सामान्यातील असामान्यत्व जिथे जिथे प्रकट झालेलं आहे त्या व्यक्ती व स्थानाचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे.
🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
भारतातील वेगवेगळ्या स्थानातील, परंतु ध्येयाने एकत्रित बांधलेल्या एकरूप व्यक्ती समूहाचे.. त्यातील कार्यकर्ता पणाचे...
प्रकरण 8, 12, 13, 19, 34 मध्ये आपणाला हे जाणवते.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते....
त्या त्या स्थानी असलेल्या निसर्गाच्या आणि तेथील माणसांच्या परस्पर सहजीवनाचे...
प्रकरण 4, 6, 7, 12, 17, 20, 30 उदाहरणेच उदाहरणे आहेत.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते...
विदेशातील व्यक्ती भारताच्या बाबतीमध्ये काय विचार करतो किंवा त्याला भारताकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि तो ते स्पष्टपणे वेळ पडल्यानंतर मांडतो त्याचे..
प्रकरण 5, 9, 17, 24, 25, 26

प्रकरण 24 में 'भारत की भारतीयता को बचाइए' जिसमें अमेरिका से आई इवेट रेसर दीमापुर में जनजाति द्वारा किए गए स्वागत के प्रति उत्तर में जो कहती है । जो लेखक ने लिखा है वह भारत के चिती की पहचान है । लेखक लिखता है ' इवेट रेसर जिसे रामरानी भी बुलाते थे उसने बताया, "मैं यहां प्रारंभ में आपसे क्षमा मांगती हूं क्योंकि हमारे देश से आए अमेरिकी मिशनरीयों ने आपके समाज को, नागालैंड को धर्मांतरित करने का प्रयास किया. यह हमारी बड़ी भारी भूल हुई. दूसरी बात यहां आकर मैंने अनुभव किया कि आप पिछड़े नहीं है और हम प्रगत नहीं है । आपकी माता बहने इतनी सुंदर कपड़ों की बुनाई आज भी हाथ से करती है । हमारी अमेरिकी महिला हाथ से बुनाई नहीं कर सकती क्योंकि हमारा समाज मशीनों पर निर्भर हो गया है ।
दुर्दैवाने त्याच वेळेस हे 
पुस्तक #अनुभूति देऊन जात ते.....
आपण स्वतःला विसरत चालल्याचे, दुर्बलतेचे प्रतीक झाल्याचे, भारतातीलच आपल्या बांधवांना विदेशी समजण्याचे त्यांना विसरण्याचे, स्वभाषा, स्वजन व स्वकर्तृत्व हरवण्याचे...
प्रकरण 5, 6, 10, 29, 33
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल पाहताना पूर्वोत्तर भारतातील एका बंधूला विदेशी म्हणून 
भारतीयांसाठी असणारे तिकीट नाकारले जातं तो प्रसंग मन हेलावून सोडतो...

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते...
विविध रूढी परंपरा, विविध नावे, विविध देवता, विविध भाव विश्व परंतु या सर्वांतही वसलेल्या एकात्मिक सूत्रांचे आणि भारतीय अस्मितेच्या रुपात एकमेकांशी जुळलेल्या सुदृढ नात्याचे
प्रकरण 5, 6, 8, 12, 13, 18, 19, 22, 23

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
स्थानिक भाषा, बोलीभाषा आणि त्या त्या मधील धर्म, संस्कृती, परंपरा जतन करण्याचे स्पुलिंग चेतविणाऱ्यांचे
प्रकरण 3, 5, 22, 28, 37

🏵️  हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्यास सिद्ध असलेल्या विजीगुशी वृत्तीचे, अंगीकारलेल्या व्रतासाठी सर्वतोपरी संघर्ष करण्याचे, त्यासाठी कंट काकिर्ण जीवन जगण्याचे आणि वेळ पडल्यानंतर हसत हसत मृत्यूला सामोरे जाण्याचे... 
प्रकरण 11, 15, 16, 28
प्रकरण 28 मध्ये बोडो भाषेसाठी बलिदान दिलेल्या श्री. बिनेश्वर ब्रह्मजींच्या बाबतीमध्ये
लेखक लिहितात :
बोडो समाज में भी एक विचार के लोगों ने बोडो भाषा की लिपि बदलकर रोमन लिपि करने का दुराग्रह बोडो साहित्य सभा के सामने किया था । लेकिन बोडो साहित्य सभा के तत्कालीन अध्यक्ष श्री बिनेश्वर ब्रह्म के नेतृत्व में इस लिपि परिवर्तन की बात को अस्वीकार करते हुए बोडो भाषा को देवनागरी लिपि का ही समर्थन किया एवं रोमन लिपि को अस्वीकार किया । लिपि बदल करना ऊपर से दिखने में साधारण बात लगेगी । लेकिन यह रोमन लिपि तो कोई भारतीय लिपि नहीं है भारतीय भाषाओं के लिखने में असमर्थ है । कई बार यह मांग करने वालों के पीछे अलगाववादी तत्वों का भी हाथ रहा है । लेकिन बोडो साहित्य सभा ने देवनागरी भाषा को बरकरार रखते हुए यह भी संदेश दिया कि हम भारत के ही है और भारत के रहेंगे ।अलगाववादी तत्वों को यह निर्णय असहनीय था इसलिए उन्होंने हिंसा का सहारा लिया । 19 अगस्त 2000 की रात को चार आतंकी श्री बिनेश्वर ब्रह्म जी के घर में घुस गए और 19 गोलियां उनके शरीर में उतार दी । 
सभी लोग स्तब्ध रह गए । सारे समाज ने आतंकियों के एक स्वर में धिक्कारा । 
अपनी भाषा की रक्षा के लिए श्री. बिनेश्वर ब्रह्म जी ने हौतात्म्य स्वीकारा । उनके इस बलिदान के कारण आज बोडो भाषा फल फूल रही है । धन्य है वह समाज । धन्य है वह लोग जो अपनी भाषा एवं संस्कृति की रक्षा हेतु जीते हैं, बलिदान करते हैं । ऐसे समाज और लोगों को शत-शत नमन

 🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते..... 
छोट्या छोट्या कार्यक्रमातून सामूहिकतेचा भाव कसा जपता येतो त्याचे. त्यातून मोठे कार्य किती सहज आणि सुलभ होऊ शकते त्याचे...
प्रकरण ... 20, 22, 31, 32, 
नाग भूमीतील एका कार्यक्रमात 4000 लोक उपस्थित राहणार होते त्यांची बसण्याची व्यवस्था खुर्चीवर करण्याचे ठरले यासाठी मोठा खर्च अपेक्षित होता परंतु आयोजकांनी त्याच गावातील 200 कुटुंबांना प्रत्येकी 20 खुर्च्या विकत घ्यायला आवाहन केले लोकांनी समाजासाठी तेवढी तसदी घेतली व सहजतेने 4000 खुर्च्या उपस्थित झाल्या.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते... 
कार्यकर्त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांचे. 
कार्य रुजवण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांचे, 
किती ही मान मरातब मिळाला तरी ही, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील गीतात वर्णन केल्या प्रमाणे वनवासी कल्याण आश्रमाचा "कार्यकर्ता" हेच आमचं श्रेष्ठत्व आहे हे कृतीने सिद्ध करणाऱ्या साधकांचे...
प्रकरण 1, 14, 16, 21, 34, 35, 36
प्रकरण 35, 36  हे पद्मश्री प्राप्त वनवासी कल्याण आश्रमाच्या दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रकाश टाकणारे आहे. 
श्री चैत्राम पवारांना आपण अनेकजण ओळखतात परंतु उत्तर बंग मध्ये कल्याण आश्रमाच्या श्रध्दा जागरण कामातून आपल्या समाजाचे धर्म रक्षण करणाऱ्या गुरुमाता कमली सोरेन यांच्या बाबतीत लेखक काय लिहितात ते पहा, 
पद्मश्री पुरस्कार प्राप्त गुरु माता का सम्मान कार्यकर्ता सम्मेलन में किया गया तब उन्हें मनोगत के लिए आमंत्रित किया गया ।
उन्होंने धीरे आवाज में संकोच करते हुए बोलना प्रारंभ किया,"एक दिन मुझे गांव वालों ने सूचना दी कि जिलाधिकारी महोदय मिलने आ रहे हैं । मैंने सोचा कि मैंने कुछ गलती तो नहीं की फिर भी इतना बड़ा अफसर क्यों मिलने आ रहा है । कुछ समय के बाद दो-तीन गाड़ियां मेरी कुटिया के बाहर आई । जिलाधिकारी महोदय ने पूछा "आप ही गुरु माता है ना?" मैंने कहा "हां" फिर जिलाधिकारी ने बताया कि "प्रधानमंत्री कार्यालय से फोन आया है कि, गुरु माता जो समाज सेवा का काम कर रही है उस हेतु उन्हें पद्म पुरस्कार देना चाहते हैं" । मैंने पूछा कि, "यह पद्म पुरस्कार क्या होता है ? और मुझे क्यों दे रहे हैं? अधिकारी ने बताया, "यह देश का सर्वोच्च सम्मान है जो समाज के लिए काम करते उन्हें भारत सरकार द्वारा दिया जाता है"  तो मैंने कहा कि, "मैं इतना बड़ा भी कार्य नहीं कर रही हूं और पुरस्कार के लिए काम नहीं कर रही हूं । अधिकारी ने तुरंत बताया कि, "इसीलिए आपको यह सम्मान देना चाहते हैं । 
मैंने कहीं बार उनको समझाने का प्रयास किया । मना किया । लेकिन वह अड़े रहे और मेरी स्वीकृति लेकर ही निकले । फिर मैं दिल्ली गई और सम्मान लेकर आई हूं । मैं तो कल्याण आश्रम के कार्य से जुड़ी है । 
उन्होंने प्राप्त सम्मान पत्र सबके सामने रखा और बताया, कल्याण आश्रम को यह सम्मान समर्पित है । सबको विनम्र भाव से नमस्कार कर गुरु माता ने आसन ग्रहण किया । 
इतना बड़ा पुरस्कार प्राप्त करने के बाद भी इतनी सहजता, सरलता, निर्मोही, निरपेक्ष वृत्ति किसी पहुंचे हुए साधक की ही हो सकती है ।
सभागार में बैठे सभी लोग स्तब्ध, शांत एवं उस करुणा मय गुरु माता को निहारत रहे ।

# प्रकरण 2 मधील आत्मविश्वासाने 14 किलोमीटर ची मॅरेथॉन जिंकणारी; आजारी म्हणून स्पर्धे पूर्वी बाद केली गेलेली प्रियांका असो अथवा प्रकरण 6 मधील सीमावर्ती मधुलोंग गावातील आजारी असलेली आजी, हव्या तेवढ्याच गोळ्या घेणारी आणि त्या बदल्यात घरातील 3 अंड्याच्या रूपात परतफेड करणारी, 
प्रकरण 8 मधील युवक जे कल्याण आश्रमाच्या परीक्षा केंद्रात शिकले. जेव्हा तिघांना प्रत्येकी पहिले मानधन रुपये 8 हजार मिळाले त्यातून प्रशिक्षण केंद्राला नवा संगणक घेवून देणारे छत्तीसगड चे युवक आपणाला कृतज्ञतेचा अनोखा संस्कार देऊन जातात.
प्रकरण 11 मणिपूर मधील जोनाकी दीदी गावातील एका भगिनीला मुस्लिम चालक घेऊन गेल्यानंतर त्याच मुस्लिम वस्तीतील चार तरुणांना सर्वांच्या समोर पकडून आपल्या घरी कोंडून ठेवून त्या बदल्यात मुलगी परत मिळवणारी सबला नारी.. 
मुंबई मध्ये 2016 मध्ये झालेल्या खेलकूद स्पर्धेच्या वेळी देशभरातून सहभागी झालेल्या 325 पेक्षा अधिक खेळाडूंना मुंबईतील विविध जाती पंथातील 200 हून अधिक परिवाराने स्वतःच्या घरातील भोजन देऊन सह भोजनाचा अनुभव घेतला. 
सामाजिक समरसतेचा तो अनोखा प्रयोग प्रकरण 13 मध्ये आपण वाचू शकता. 
जशपुर स्वयंपाकी झांगुल मामा.. आपल्या पुंजीतून कल्याण आश्रमाच्या जशपुर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी खोली बांधणाऱ्या मामाना मुंबईतील नाना पालकर रुग्ण सेवेचेच प्रतीक का मानू नये?. नीता बर्वे पुण्यातील धडाडीची कार्यकर्ती 1999 मध्ये नागालँड मध्ये कार्य करण्यासाठी गेली तेव्हा प्रवासाला साधन म्हणून अनेक वेळेला ट्रक टेम्पोच्या छताचा उपयोग बिनधास्त पणे करायची. (नीता ताई आज विदर्भ कल्याण आश्रमाची पदाधिकारी आहे).... 
...अशा अनेक अनुभूतिचे आगार असलेले हे पुस्तक आत्मविश्वास जागवण्याचे, समरसतेचे, मातृ हस्ते भोजना द्वारे पारिवारिक संबंध निर्माण करण्याचे, सभ्यतेचे, गरिबीतील श्रीमंतीचे, स्वाभिमानाचे, बरोबरीने समाजातून लुप्त होत चाललेल्या अनेक सदगुणांचे जे आज धूमकेतू प्रमाणे अवचित कुठे तरी प्रकटात त्याचे पारदर्शी, शाश्वत रूप आहे.

मायबाप वाचकांना गाऱ्हाणे इतकंच आहे की त्यांनी हे #अनुभूति पुस्तक विकत घेऊन आवर्जून वाचावे. संग्रही ठेवावे. इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावे. जमल्यास वाढदिवस अन्य मंगलमय कार्यक्रमात अनेकांना भेट द्यावे. संस्थानीही आपल्या उपक्रमात सहभागी करावे.

कारण हे सारे अनुभव आणि अनुभूति ज्यांनी घेतली ते अतुल जोग ह्याच जनजाती समाजासाठी समर्पित जीवन जगत आहेत. त्यांच्या परिचयामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर चार वर्षे नोकरी केली ती सोडून प्रचारक म्हणून राष्ट्रकार्यात उडी घेतली. 
प्रथम पाठ म्हणजेच प्रकरण एक मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ जाताना समाजाच्या साठी कार्य करण्याची संधी मिळाल्या बद्दल सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जेव्हा संपूर्ण पूर्वांचल घुसखोरी व आतंकी गतिविधिने धगधगत होता त्यावेळी पूर्वांचलामध्ये त्यातही नागालँड मध्ये 1994 साली तेथे जाण्याचा संघटनेचा निर्णय शिरसावंद्य मानून गेले. 
पहिल्याच भेटीमध्ये स्वामी असिमानंद यांनी जो कानमंत्र दिला 'आपण जनजाती क्षेत्रात शिकवायला नाही तर शिकायला जात आहोत आणि याच भावनेने काम केले तरच आपण त्या समाजाशी मैत्री करू शकतो आणि थोडेफार परिवर्तन करू शकतो" पहिल्या दिवशी मिळालेला हा कान मंत्र अगदी आजही अनुसरून त्याप्रमाणे कार्य करणारे व इतरांना ही तोच सल्ला देणारे अतुल जोग हे 2018 पासून वर्तमान अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे मा. अखिल भारतीय संघटन मंत्री आहेत. 
प्रकरण सात मध्ये तीर किसने मारा? या कथे अंतर्गत गुरुनानक जी, शंकर देव यांचा तिबेट ला जातेवेळी पाचशे वर्षांपूर्वी पूर्वांचलात झालेल्या प्रवासाचे वर्णन आलेले आहे.  
भारत भ्रमणाचा उल्लेख आलेला आहे. 
ज्यांना ज्यांना देश घडवायचा आहे अथवा अमुलाग्र परिवर्तन करायचं असल्यास सर्वप्रथम त्यांनी भारताचे अखंड दर्शन करणे महत्त्वाचे आणि ही परंपरा सर्व संतांनी तर पाळलीच बरोबरीने स्वामी विवेकानंदांनी ही परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारताचे दर्शन घेतले. महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये 1915 मध्ये आले तेव्हा त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सर्वप्रथम भारत फिरण्यास सांगितले. हाच वसा सोबत घेऊन अतुलजी देशभर जनजाती समाजासाठी भ्रमण करत आहेत. आणि या भ्रमणामुळे त्यांच्या वाणीला आणि कृतिला भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झालेले होतेच ते सिद्ध हस्ते आता लेखणीत ही उतरलेले आहे. अतुलजींनी अनेक भाषणांमध्ये, बैठकींमध्ये यातील अनेक उदाहरणे अत्यंत तन्मयतेने सांगितलेली आहेत परंतु सरळ, साध्या, सोप्या भाषेत, कमी शब्दात त्यांनी ही सर्व व्यक्तिचित्रणे लिखाणाच्या मार्फत उभी केलेली आहेत एका अर्थाने जिवंत केलेली आहेत. त्यात त्यांचा लेखनाचा पैलू,   आपला मुद्दा पटवून देताना संस्कृत समर्पक श्लोक व गीतांच्या ओळी यातून त्यांचा विविध विषयातील व्यासंग ही प्रभावीपणे समोर आलेला आहे हे ही या #अनुभूति चे यश म्हणावं लागेल... 
अपनी बात मध्ये शेवटी त्यांनी उल्लेख केला आहे जे त्यांच्या पारदर्शी व्यक्तिमत्वाचे धोतक आहे. 
' इसमें जो भी अच्छा है वह समाज का है यदि कुछ कमी है वो मेरा है ..


पुस्तक सर्व दृष्टीने उत्तम झालेलेच आहे परंतु अतुलजींकडे पूर्वांचलातील फारच सुंदर छायाचित्रही आहेत. त्यातील ते जाणकार आहेत या पुस्तकांमधील फोटो थोडे अधिक चांगले छापता आले असते किंवा रंगीत करता आले असते तर बरे झाले असते अर्थात हे माझे मत आहे.

या #अनुभूति ला तितक्याच अनुभव संपन्न अशा वरिष्ठ कार्यकर्त्याची प्रस्तावना लाभलेली आहे जे स्वतः जनजाती समाजातील आहेत. आपल्या कर्तृत्वाने अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी विराजमान झालेले श्री. सत्तेंद्र सिंह यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये जनजाती समाजाची जी परंपरागत वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. जनजाती समाज ज्या आदर्श मूल्यांसाठी ओळखला जातो त्या सर्व पैलूंना अतुलजींनी आपल्या या पुस्तकात समाविष्ट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि हा यशस्वी प्रयत्न ते करू शकले कारण जनजाती समाजाला त्यांनी सर्वार्थाने आपलेसे केलेले आहे. त्यांच्या उन्नती साठी झिजत आहेत त्यामुळे जनजाती समाज आणि लेखक हे खऱ्याअर्थाने अद्वैत रूपच आहे असे सत्येंद्र सिंह ह्यांना वाटते म्हणून आपल्या प्रस्तावनेत ते शेवटी म्हणतात.
श्री. अतुल जोग जी कार्यकर्ताओं द्वारा दिए गए दिव्य मंत्र और उनके जीवन के अनुभव एवं अनुभूति को आत्मसात करने के परिणाम स्वरूप वनवासी कल्याण आश्रम के राष्ट्रीय संगठन मंत्री है. वह साधारण कार्यकर्ता से असाधारण बनकर अपने दायित्व का सफलतापूर्वक निर्वहन कर रहे हैं.  यह कृती सभी कार्यकर्ताओं के लिए सार्थक सिद्ध होगी ऐसा पूर्ण विश्वास है. 
इस 'अतुलनीय' आदर्श जीवन शैली की #अनुभूति के लिए श्री अतुल जोग को बहुत-बहुत बधाई अभिनंदन एवं हार्दिक शुभकामनाएं 
मा. सत्येंद्र सिंहजिंचे मी पण आभार मानतो त्यांनी माझ्या लेखाला आयते शीर्षक मिळवून दिले 'अतुल'नीय - "#अनुभूति" 

एकाच प्रवास बैठकीत संपलेले हे पुस्तक संपता संपताच यावर काहीतरी नक्की लिहिले पाहिजे असा संकल्प करूनच बंद केले. 

पुस्तक परीक्षण सकाळी गाडीतच लिहायला घेतले ह्याचे आणखी एक कारण म्हणजे या सर्व पुस्तकाला लाभलेली पार्श्वभूमी ही पूर्वांचलाची आहे आणि माझा उत्तर पूर्वांचलाशी बादरायण प्रकारचा संबंध आहे.
प्रत्यक्ष माझं पूर्वांचलात जाणे जरी कमी असले तरी 1991 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या SEIL ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून मी भावनिक दृष्ट्या जोडलेलो आहे. महाराष्ट्र व भारतात वेळोवेळी आलेल्या व तेथे गेलेल्या SEIL tour च्या आयोजनामध्ये एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका  निश्चितच राहिलेली आहे. केंद्रीय कार्यालय मंत्री जबाबदारी येण्यापूर्वी वर्तमान सर कार्यवाह माननीय दत्ताजींच्या पूर्वांचल व तेथील कार्यात विशेष आग्रहा मुळे मी SEIL जो उत्तर पूर्वांचलासाठी चालवला जाणारा न्यास आहे व विद्यार्थी निधी ज्याचे अध्यक्ष दिवंगत मदन दास जी व प्रा. बाळासाहेब आपटे होते अशा ट्रस्ट चे काम ही केलेले आहे. 
माय होम इज इंडिया निमित्ताने मुंबई व तेथील निर्माण झालेले ऋणानुबंध. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, सेमिनार, आर्थिक उभारणी साठी दरवर्षी निघणारी स्मरणिका. त्या त्या स्मरणिकेचे आकर्षक शीर्षक या सर्व घडामोडीचा पाया हा इमोशनल इंटिग्रेशन आहे जे SEIL चे ब्रीद वाक्य आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय कार्यालय मंत्री असताना या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांची व्यवस्थात्मक जबाबदारी अनेकांच्या बरोबरीने माझ्याकडे ही होती. त्यामुळे आमच्या भागातून  पूर्वांचलात गेलेला नील हेळेकर कार्यकर्त्या पेक्षा आमच्या शाळेतील हेळेकर टीचरांचा मुलगा म्हणून परिचित होता त्या सह अगदी सुरवाती पासून तेथे कार्यरत असलेले मा. व्ही सतीश जी, राघवन जी, मित्र शाम मोगा, संजय कुलकर्णी, राजू नन्नावरे, अविनाश कोळी, विनोद पुसदकर, आशिष भावे, योगेश पाताडे, सुरेंद्र नाईक श्रीहरी, नीरव गेलानी, प्रितेश देसाई , अदिती  कुलकर्णी ते 2015 पर्यंत पूर्वांचालात काम करण्यासाठी पाठवलेले नवीन दमाचे कार्यकर्ते. 
पूर्वांचलाचा ध्यास घेऊन स्थानीय ठिकाणी आपल्या प्रतिभेनुसार कार्य करणारे शशिकांत, अतुल कुलकर्णी बरोबरीने My home is इंडिया मार्फत जोडलेले सुनील देवधर व त्यांचे पूर्वांचल समजून देणारे वक्तृत्व कार्यक्रम, IMDT act, घुसखोरी त्यावरील प्रस्ताव असतील अथवा कोकराजार हिंसेच्या वेळेला केलेली मदत. 
किमान चार-पाच वेळेला पूर्वांचला संदर्भात भाषण करताना केलेला अभ्यास, पूर्वांचलात तात्पुरते कार्य करण्यासाठी जाणाऱ्यांना मदत करणे बरोबरीने विविध कार्यालयात वास्तव्यात असलेले पूर्वांचलातील कार्यकर्ते. त्रिपुरातून मुंबईत भूमिगत असलेल्या एका कार्यकर्त्याचा मी तीन वर्षे गार्डियन होतो. 
अशा सर्व माध्यमातून तेथील झालेली मैत्री ज्यात आघाडीचा दिग्दर्शक आणि सध्या सरकारी अधिकारी असलेला के डी(कोलेन डॉल्गोपू), खासदार दिलीप सैकिया, किसान संघाचा प्रमुख कृष्णा, नेपाळ मध्ये कार्य करणारा दीपक अधिकारी त्याची बहीण पुष्पा, अशी अनेक नावे सांगता येतील.. पुस्तक वाचता वाचता या सर्व स्मृती ही जागृत झाल्या. तेथील सहज उच्चारता न येणारी नावे पण आपलीच आहेत ह्याची असलेली जाणीव, वेगवेगळ्या जमाती त्यांचे परस्पर संबंध, दिल्ली कार्यालयातील नीतू,  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पूर्वांचल क्षेत्रातील जनजाती वीरांचे योगदान यासंदर्भात पुस्तक लिहिणारे श्री. जगदंब मल यांच्याशी झालेला संवाद आणि म्हणून केवळ आपल्या समाधानासाठी त्या रम्य स्मृतींना उजाळा देऊन गेलेल्या ह्या पुस्तकाचे परीक्षण केलेच पाहिजे आणि वेळ न घालवता मी ते करू शकलो याचा आनंद अधिक आहे कारण जो आत्मीयतेचा गाभा या #अनुभूति चा आहे तोच सामाजिक संवेदनेने कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांचा आहे. 

खरंतर लिखित स्वरूपात पुस्तकाचे परीक्षण करण्याचा हा माझा पहिलाच व्यापक प्रयत्न आहे. याच्या अगोदर शेफालीताईच घार हिंडते आकाशी या पुस्तकाचं मी एका वेगळ्या संदर्भात थोडक्यात परीक्षण केलेलं होतं.
मित्र सुहास वैद्यने लिहिलेल्या वैदेही पुस्तकाचे निरूपण करावे असे डोक्यात होते पण ते काम अजून अर्धेअधुरे आहे. 
अनेक प्रशिक्षणामध्ये पुस्तक परीक्षण कसं करावे असे सत्र ही मी घेतलेले आहे. परमपूजनीय गुरुजी लिखित 'राष्ट्र' या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण बैठकीमध्ये पण केल्याचे आठवते ह्या भांडवलावर आजही ज्यांच्या बरोबर मैत्री कायम आहे, निसर्गाचं अनुपम लेण ल्यालेला हा स्वर्गमय प्रदेश, या पुस्तकातील वर्णन केलेल्या साऱ्यां सोबत असलेले आपले अदृश्य नाते. कधी काळी ह्या साऱ्या प्रदेशातून कागदावर का होईना फिरलेलो आहे त्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळते आहे ह्याच भावार्थाने या पुस्तकाचे मला जेवढे मोल समजले त्याप्रमाणे समीक्षा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 

अतुलजींच्या व माझ्या पहिल्या प्रयोगाला आपण सकारात्मक दाद देऊन हे पुस्तक आवर्जून विकत घेऊन वाचाल या अपेक्षेसह... 

या पुस्तकाचे महत्व अशा पद्धतीने सांगता येईल ज्याप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये परिषदेचे शिल्पकार प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्यावर आधारित "माणूस नावाचे काम" हे पुस्तक आहे जे सर्व दूर, सर्वांकडे आदर्श कार्यकर्ता व्यवहाराची गीता म्हणून संग्रही आहे त्याचप्रमाणे अजून ही अपरिचित उत्तर पूर्वांचल सर्वांच्या समोर येण्यासाठी, निराशे मध्ये आशा उत्पन्न करण्यासाठी, कामाची गती वाढविण्यासाठी,  कधी मध्ये कामाचा कंटाळा आला तर ' चलते चलो' चा नारा देण्यासाठी, सामाजिक कामाचा  हुरूप वाढविण्यासाठी, सामूहिक समाज परिवारासाठी, ध्येयावर श्रद्धा व निष्ठा अविरत वाढविण्यासाठी हे टॉनिक रुपी #अनुभूति पुस्तक कोणत्या ही  पानापासून वाचून सतत प्रेरणा मिळण्यासाठी शुभेच्छा !  

ज्याप्रमाणे काही सिनेमांना टॅक्स फ्री केले जात त्याप्रमाणे अशा चांगल्या पुस्तकांनाही अधिक सवलतीच्या दरामध्ये मिळण्याची व्यवस्था हवी जेणेकरून हे सकारात्मकतेचे व गुणविशेषाचे परागकण  अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. 
हिंदी प्रमाणेच अनेक भाषांमध्ये याचे भाषांतर झाले तर फारच उत्तम होईल. 
पुढे मागे मी मराठीत नक्की याचे भाषांतर करू शकतो.

पाथेय.... जाता जाता....
भगिनी निवेदिता यांनी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन भारतीय व विदेशी मानसिकता कशा प्रकारे आहे ते व्यक्तिगत व सामूहिक व्यवहारातून स्पष्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, विदेशातील माणूस सार्वजनिक साधन सुचिता, नियम याचं काटेकोरपणे पालन करेल त्याच्या दृष्टीने भारतीय व्यक्ती व समाज हा याबाबतीत मागासलेला आहे परंतु प्रत्येक सनातन भारतीय हा ईश्वर एक आहे. पुनर्जन्म हा कर्मावर अवलंबून आहे. आत्मा अमर आहे आणि चराचरामध्ये तो व्याप्त आहे याला अनुसरूनच आपलं जीवन जगेल जे पाश्चिमात्य एखाद्यालाही समजणे कठीण आहे.
हेच अंतिम सत्य या संपूर्ण पुस्तकाचे सार आहे. हे मांडताना लेखकाला हृदय द्रावक अशा अनुभवाला सामोरे जावे लागले.
ज्या घरी गेले होते त्या घरातील मुलगा दोन दिवसापूर्वी अपघातात गेला होता. ह्याची कोणती ही पूर्वकल्पना आलेल्या लोकांना नाही केवळ प्रवासा निमित्त ते आपल्या घरी आलेले आहेत हे जाणून घरातील सर्वांनी आपले दुःख बाजूला ठेवून अतिथी देवो भव या नात्याने केलेले स्वागत व त्यानंतर समोर आलेली करुणामयी कहाणी. जी शरीर नश्वर है ,आत्मा अमर है ह्या कथेत लेखकाने मांडलेली आहे. जो माझ्या दृष्टीने शेवट नसून #अनुभूतिचा प्रारंभ आहे.
 
उसपर लेसिथोजी बोले, "अनहोनी हो गई, जानेवाला चला गया, फिर हम क्यों रुके ? अपना काम करते जाओ । हम उस मां की तरफ भी देख रहे थे । वह भी शांतभाव से अपने कार्य कर रही थी । मन में विचार आया, सरकारी नौकरी करने वाले जवान लड़के का असमय निधन होना माता-पिता के लिए कितना  कष्टदायक होता है । लेकिन फिर भी जीवन के सत्य को जानते और मानते हुए व्यवहार करनेवाले इन लोगों से बहुत कुछ सीखना बाकी है, ऐसा लगा ।।।।

अशी ही
#अनुभूति घ्या #अनुभूति द्या......